प्रसाद कानडे
पुणे : भारतीय रेल्वेने प्रवासाभिमुख होण्याचे धोरण स्वीकारले आहे. प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करतानाच त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना आखण्यासाठी रेल्वेने चोवीत तास कार्यरत राहणाऱ्या आयटी सेलची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेत पहिल्यांदाच अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाली असून ती पुण्यातल्या घोरपडी शेड येथून काम करणार आहे.
रेल्वे प्रवासात प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी डबे अस्वच्छ असतात. कधी शौचालयात असह्य दुर्गंधी असते. कधी डब्यात समाजविघातक प्रवृत्ती सहप्रवाशांना त्रास देतात. अशा कोणत्याही तक्रारींसंदर्भात ऑनलाइन तक्रार केल्यानंतर अर्ध्या तासात त्याचा निपटारा केला जात असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. आता या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास आनंददायी होण्यासाठी, त्यांच्या तक्रारींवर चोवीस तास काम केले जाणार आहे. याचा डेटा तयार करून उपाययोजना आखण्याचे काम आयटी सेल करणार आहे. पुणे विभागातील वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयकुमार दडस यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
घोरपडी डिझेल शेडमध्ये उभारण्यात आलेल्या या आयटी सेलचे उद्घाटन मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकतेच केले. पुण्यातील आयटी सेलमधूनच मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर व पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्यांचे कोचसंदर्भात तक्रारीचे स्वरूप जाणून घेतले जाईल. यासाठी प्रत्येक विभागात लवकरच स्वतंत्र यंत्रणा उभारली जात आहे.
पुण्यातून रोज सरासरी ६ तक्रारी
पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्यातून रोज सुमारे ६ तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे येतात. डब्यांत पाणी नसणे, शौचालय तुंबणे, डब्यांत अस्वछता, पाण्याच्या टाकीतून पाणी गळणे, खिडक्या नादुरुस्त, विद्युत उपकरणे बंद अशा स्वरुपाच्या या तक्रारी प्रामुख्याने आहेत.
डब्यांची देखभाल दुरुस्ती
दर सोळा महिन्यांनी डबे आयओएच (इंटर मीडिएट ओव्हरऑयलिंग) साठी पाठवले जातात. यात डब्यांची दुरुस्ती केली जाते. याचे देखील रेकॉर्ड आयटी सेल ठेवणार आहे. धावत्या रेल्वेतील एखादा डबा अचानक नादुरुस्त झाल्यास त्याच्या कारणांचा येथे अभ्यास केला जाणार आहे.
“पुण्यात मध्य रेल्वेचा पहिला आयटी सेल सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांच्या तक्रारी, अडचणींचा शोध घेऊन त्याचा अभ्यास करणे यात अपेक्षित आहे. वारंवार उद्भवणाऱ्या अडचणींवर कायमस्वरुपी उपाय शोधण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे असे मध्य रेल्वे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले आहे.''