पुणे : सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेत सगळ्यात स्वस्त प्रवास म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. पण, यातही काही लोक विनातिकीट प्रवास करतात. वेळोवेळी पुणेरेल्वे विभागाच्या वतीने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले जाते आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील केली जाते.
दिवाळीच्या काळात असो वा इतर दिवशी, रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. बहुतांश फुकट्यांवर रेल्वेतर्फे दररोज दंडात्मक कारवाई केली जाते. ऑक्टोबर महिन्यात पुणे रेल्वे विभागात २७ हजार फुकट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ कोटी ३० लाखांचा दंडदेखील वसूल करण्यात आला.
अनियमित प्रवासासाठी ३२ लाखांचा दंड वसूल
फुकट्या २७ हजार जणांवर ५ हजार ५१० प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ३२ लाख ८१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या ३०० जणांकडून ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या ७ महिन्यांत २ लाख ५ हजार ४०० केसेसमधून १४ कोटी ६८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागातील पुणे, दौंड, बारामती, लोणावळा यासह इतर रेल्वे स्टेशनवर सतत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शोध घेतला जात असतो. विनातिकीट प्रवास करताना आढळल्यावर दंड भरण्यापेक्षा प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहनदेखील पुणे रेल्वे विभागातर्फे वारंवार करण्यात येत असते.
आमच्याकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू असते. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगाची हवादेखील खावी लागू शकते.
-मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे.