पुणे : जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी चिंता निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली असून, १९ जुलैपर्यंत ४८ टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्या ६० टक्क्यांपर्यंत गेल्या असण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.या हंगामात सोयाबीन व मका लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत २७४ टक्के सोयाबीन व मका ११५ टक्केपर्यंत लागवड झाली आहे. जून महिन्यात फक्त ८१.३६ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पेरण्या कशा करायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता. जून महिन्यात फक्त ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र, जुलै महिन्यात पाऊस शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला. पहिल्याच आठवड्यात १६५.११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीच पाणी झाले. मात्र, तो सतत कोसळत असल्याने पेरण्यांसाठी परिस्थिती निर्माण होऊनही करता येत नव्हत्या. मात्र, १० जुलैैनंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांनी वेग घेतला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात २३ टक्केपर्यंत गेलेल्या पेरण्यात आता १९ जुलैैपर्यंत आतापर्यंत ३५ लाख ५१ हजार ५० हेक्टरपैकी १६ लाख ९१ हजार हेक्टरवर म्हणजे, ४८ टक्के पेरण्या झाल्या. गेल्या पाच-सहा दिवसांत चांगल्या पेरण्या झाल्या असून, त्या ६० टक्क्यांपर्यंत झाल्याचा आंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
पावसाने दिली खरिपाला साथ
By admin | Published: July 25, 2016 2:15 AM