पुणे : दोन आठवड्यांपुर्वी वीसपेक्षा अधिक बळी घेणाऱ्या पावसामुळे हादरलेल्या सहकारनगर-अरण्येश्वर परिसरातील नागरिकांच्या पोटात बुधवारी पुन्हा गोळा आला. संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिल ओढ्याच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली. हे पाणी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वसाहतीमधील 40 पेक्षा अधिक घरांमध्ये घुसले. तर तावरे कॉलनी, शिवदर्शन, पर्वती दर्शन भागामध्ये गटारींमधून पावसाचे वर आलेले पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसले. स्थानिक कार्यकर्त्यांनी याठिकाणी तात्काळ मदत कार्य सुरु केले. दोन आठवड्यांपुर्वीच्या पुराच्या आठवणीने नागरिकांच्या अंगावर काटा आला.पुण्यात आलेल्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान अरण्येश्वर, सहकारनगर परिसरातील नागरिकांचे झाले होते. टांगेवाला कॉलनीमधील सहा जणांचा या पुरात बळी गेला होता. शेकडो गाड्या पाण्यात वाहात आल्या होत्या. तर अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. शेकडो वाहने आठवडाभर पाण्याखाली होती. प्रशासन, मंडळांचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी मदत व बचाव कार्याला सुरुवात केली होती. अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. नागरिक जीव वाचविण्यासाठी सर्वस्व सोडून घराबाहेर पळाले होते. मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी नागरिक धडपडत असतानाच बुधवारच्या पावसाने पुन्हा तडाखा दिला.
नागरिकांचा रास्ता रोको शहरात पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी होत असताना नागरिकांच्या मालमत्तांचे आणि जिविताचेही नुकसान होऊ लागले आहे. पालिका प्रशासनाच्या आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पर्वती दर्शन येथे रात्री सव्वाआठच्या सुमारास नागरिकांनी रास्ता रोको करीत प्रशासनाचा निषेध केला.