लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे गेली चार/ पाच वर्षांपासून पूर्ण भरली जात आहेत़ सर्वत्र मुबलक पाऊसही झाला आहे, तरीही आजही शहरात हजारो टँकर महापालिकेला चालू ठेवावेच लागत आहेत़ प्रशासनातील काहींना हाताशी धरून पाण्याचे टँकर पुरविण्याचा ठेका मिळविणे हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून टँकर माफियांकडून शहरात सुरू आहे, पण यावर राज्यकर्ते एक चकार शब्द बोलायला तयार नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे़
भौगोलिक परिस्थितीमुळे शहराच्या उंच भागासह काही उपनगरांमध्ये तथा २०१७ मध्ये नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांना पाण्याच्या टँकरची गरज आहे, परंतु वर्षोनुवर्षे टँकरनेच पाणीपुरवठा करण्यापेक्षा येथे तेवढा खर्च पाणीपुरवठा योजनेकरिता का खर्च केला जात नाही, असा प्रश्नही आता या भागातील नागरिक करीत आहेत़ या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला तरी, पाण्यासाठी येथील नागरिकांची वणवण मात्र थांबत नाही़ याचे उत्तम उदाहरण हे देवाची ऊरळी व फुरसुंगींसह परिसरातील गावे आहेत़
सध्या पुणे शहरात टँकरमाफिया हा शब्द चांगलाच प्रचलित झाला आहे़ लाखो रूपयांची बिले अनेक सोसायट्यांकडून या माफियांना मिळतात, त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेला हाताशी धरून पाणीपुरवठा यंत्रणा असतानाही काही भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होऊ दिला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे़ एकीकडे २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेतून शहरातील सर्व भागांना २४ तास पाणी मिळेल असा दावा गेल्या काही वर्षांपासून केला जात असला तरी, संथ गतीने सुरू असलेली ही योजना प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे़
-------------------
पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू होत नाही. मंतरवाडीत पाणी येते, परंतु उरुळीत पाणी नाही़ कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइने पाणी सुरू करावे, अशी मागणी वारंवार केली़ पण त्याला महापालिका प्रशासनाने कोणाताही प्रतिसाद दिलेला नाही़
अतुल बहुले, शहाराध्यक्ष भारिप़
---------------------
दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च
पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविण्यासाठी महापालिकेकडून वर्षाकाठी विभागवार निविदा काढल्या जातात़ महिन्याकाठी याची रक्कम दहा लाखांपासून ५० लाखांपर्यंत अदा केली जाते़ एकट्या उरुळी देवाची व फुरसुंगीं येथे दरवर्षी ७ ते ८ कोटी रूपये खर्च होत आहेत़ हाच खर्च महापालिकेने पाणीपुरवठा योजनेवर खर्च केला तर, येथील अडीच लाख नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल, ही मागणी करीत या भागातील नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत कावड घेऊन आंदोलन केले होते़ वारंवार लोकप्रतिनिधींची होणारी मागणी, नागरिकांचे हंडा मोर्चा याकडे मात्र प्रशासन कोणासाठी दुर्लक्ष करीत आहे हा प्रश्न पडत आहे़
--------------------------
पाण्याचे टँकर पुरविणे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण
महापालिकेकडून टँकर पॉईंटवरुन दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून विविध ठिकाणी पाठविले जातात़ मात्र याठिकाणी प्रत्यक्षात भरलेले टँकर व नोंदविलेल्या टँकरची संख्या यात मोठी तफावत असून, पाण्याचे टँकर पुरविणे म्हणजे हे काम भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
------------------
फोटो मेल केला आहे़