तापमानात झाली वाढ
दमदार पावसाची प्रतीक्षा, तापमानात झाली वाढ
राजेगाव : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावात ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने दडी मारली असून, गेल्या आठवड्यात या भागात तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. या भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
या परिसरात असणाऱ्या भिगवण स्टेशन येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमापक यंत्रामध्ये आजअखेर फक्त २८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती कर्मचारी पोपट काळे यांनी दिली.
या महिन्यात दोन वेळा मुसळधार पावसाचा दिलेला अंदाजही फोल ठरला दिसून येत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने या भागात जोरदार आगमन केले होते. जुलै महिन्याच्या मध्यंतरी थोडाफार झालेल्या पावसाने खूप मोठी विश्रांती घेतल्याने बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, शिरापूर आदी गावांना उजनी धरणाचे बॅक वाॅटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदान आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. या परिसरात दरवर्षी साधारणच पाऊस होत आलेला असला तरीपण पुणे परिसरातील धरण साखळीत भरपूर पाऊस पडून उजनी धरण भरण्याची वाट या भागातील शेतकरी पाहत असतो.
दरम्यान, जुलै महिन्याच्या मध्यंतरी पडलेला पाऊस ऑगस्ट महिना संपत आला तरी रुसलेलाच दिसतोय. या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या परिसरातील विहिरी, कूपनलिका हे पाण्याचे स्रोत अद्यापही कोरडेच आहेत. त्यामुळे पुरेशा पाण्याअभावी या परिसरात उसाच्या लागवडीच्या प्रमाणात खूप घट झाली आहे.
उसाला पर्याय म्हणून या भागातील शेतकरी यंदा मका, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांकडे वळलेला दिसून येत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या थोड्याफार पावसाच्या ओलीवर या पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकं सुकून चालली आहेत.
गेले दोन आठवडे या भागात आकाशात काळे ढग दाटून येत आहेत. परंतु दमदार पाऊस पडत नाही. त्यामुळे दौंड तालुक्यातील पूर्व भागातील बळीराजा वरुणराजाची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत.