लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रवास, स्वयंपाक, व्यक्तिमत्त्व विकास, जीवनशैली हे सगळ्यांच्या आपुलकीचे विषय. ‘हटके पदार्थां’ची पाककृती जाणून घ्यायची असो किंवा प्रवासाचा अनुभव... मातृभाषेत मिळालेली माहिती अधिक भावते. त्यामुळेच डिजिटल विश्वात मराठी भाषेने शब्दश: अटकेपार झेंडे रोवल्याचे दिसते. समाजमाध्यमांवर जीवनशैलीशी संबंधित नानाविध विषयांवर सहजसोप्या भाषेत चर्चिले जात आहेत. त्याला कोट्यवधी ‘लाइक्स’, ‘हिट्स’ मिळत आहेत.
‘माझा मराठाची बोलू कौतुके’ या ओळींमधून मराठी भाषेबद्दलच्या अपार प्रेमाची झलक दिसते. मात्र, मराठीबद्दलचे प्रेम केवळ बोलण्यापुरते न राहता प्रत्यक्षात व्यक्त झाले तर त्यातली मजा खूप वेगळी असते. हेच लक्षात घेऊन फेसबूक, यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दररोजच्या आयुष्यातील अनुभव, प्रवास, स्वयंपाक, जीवनशैली, फॅशन अशा अनेक विषयांवर नेटकरी मराठीतून व्यक्त होऊ लागले आहेत.
सुमारे अकरा कोटी मराठीभाषक जगभर विखुरले आहेत. जीवनाशी निगडित कितीतरी विषयांच्या माहितीचा खजिना इंटरनेटवर विविध भाषांमध्ये उपलब्ध असतो. मात्र, मातृभाषा कायमच भावते आणि त्यामुळे मराठी भाषेतील अनुभव, लिखाण जास्त भावते, अशी प्रतिक्रिया अमेरिकेत राहणाऱ्या मानसी जोशीने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
चौकट
‘मुंबई स्वयंपाकघर’ हा ग्रुप सुरू करण्यामागे आईच्या विस्मृतीत गेलेल्या पाककृती आणि साधा, सोपा, सकस आहार याबद्दल चर्चा व्हावी, असा विचार डोक्यात होता. फेसबुकसारख्या माध्यमांमध्ये खाद्यविषयक अनेक समूह आहेत. त्या समूहात लाखो सदस्य असतात. आहार, स्वयंपाक हे लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. त्यांचे प्रयोग दाखवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक त्यात सहभागी झाले. खाद्यसंस्कृती हा मराठी भाषेतला खूप मोठा विषय आहे.
- भक्ती चपळगावकर
-----------
यूट्यूब चॅनेल सुरू करताना जीवनशैलीशी संबंधित विषयांवर भर द्यायचा, हे आधीपासून ठरवले होते. हिंदी किंवा इंग्रजीत चॅनेल सुरू केल्यास जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, असे अनेकांनी सुचवले. मात्र, मायमराठीत जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होता येते आणि आशयही समृद्ध करता येतो, या विचाराने मराठीवरच भर दिला. डिजिटल बाजारपेठेत मराठीचा झेंडा आपणच रोवला पाहिजे. प्रवासाचे अनुभवही चॅनेलच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली आणि चांगला प्रतिसाद मिळू लागला. परवडण्याजोगा प्रवास, टिप्स आणि ट्रिक्स, अनुभव मांडताना खूप चांगला अनुभव येतो आहे.
- ऊर्मिला निंबाळकर, सुकीर्त गुमास्ते