पुणे : नेहमीपेक्षा काही दिवस आधी महाराष्ट्र व्यापलेल्या मान्सूनने नेहमी दुष्काळाची छाया असलेल्या मराठवाड्यावर यंदा चांगली कृपादृष्टी केली असली तरी विदर्भावर त्याची वक्रदृष्टी झाली आहे़ विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ६ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे़ मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
राज्यात यंदा पाऊस थोडा उशिरा आला असला तरी त्याने १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता़ सुरुवातीच्या काही दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली़ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्या जिल्ह्यात यंदा जोरदार वृष्टी झाली आहे.
कोकणातही सातत्याने पाऊस पडत आहे़ त्यामुळे यंदा कोरोनाचे सावट असतानाही वेळेवर पेरण्या झाल्या आहेत़ त्याचवेळी विदर्भाकडे मात्र मान्सूनने पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे़ विदर्भात सरासरीपेक्षा ५ टक्के कमी पाऊस झाला आहे़ त्यात ६ जिल्ह्यांत खूप कमी पाऊस झाल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता राज्यात १९ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे़ त्याचवेळी कोकणात २१ टक्के, मध्य महाराष्ट्रात २० टक्के आणि मराठवाड्यात ४७ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
कमी पाऊस झालेले जिल्हेगोंदिया (-३८), नंदुरबार (-२६), पालघर (-१७), यवतमाळ व गडचिरोली (-१५), सातारा (-१४), अकोला (-१३), भंडारा(-११), चंद्रपूर (-१), ठाणे (-२)
सर्वसाधारण पाऊस झालेले जिल्हे : रायगड (सरासरीइतका), नाशिक (६), नागपूर, वर्धा (२), अमरावती (४)
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे : मुंबई शहर (४०), रत्नागिरी (२७), सिंधुदुर्ग (५७), मुंबई उपनगर (५९), धुळे (२२), जळगाव (४३), कोल्हापूर १०), पुणे (१४), सांगली (२१), हिंगोली (१९), जालना (५१), लातूर (५०), नांदेड (१५), बुलढाणा (२३), वाशिम (३२) सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झालेले जिल्हे : अहमदनगर (७९), सोलापूर (६९), औरंगाबाद (८१), बीड (७७).