नीरा : यंदा भरपूर पाऊस होऊन पिके चांगली येणार, अशी भविष्यवाणी सर्वत्र करण्यात आली होती. जून महिना संपला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. काहींनी तर आगाप पेरणी केल्या. त्याच्या पिकांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होऊन दुबार पेरणीचे ‘संकट आ वासून’ आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आठ जून रोजी पहिले मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच शेतात पाळी घालणे, पिकांचे नियोजन करणे आदी कामांना सुरुवात केली. परंतु काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर संपूर्ण नक्षत्र कोरडे गेले. २१ जूनला दुसरे आर्द्रा नक्षत्र सुरू झाले. कोल्हा हे या नक्षत्राचे वाहन असून या नक्षत्रानेही शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. तसेच अजूनही आठवडाभर पाऊस होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीने सर्वच पिकांच्या दुबार, तिबार पेरण्या करूनही पिके नष्ट झाली होती. परिणामी या वर्षीसाठी जादा दराने बियाणे खरेदी करण्यात आली आहेत. वाटाण्याचे दरही मागील वर्षीपेक्षा जास्त वाढले असून, भुईमूग बियाणे तब्बल २०० रुपयांवर गेले आहे. कांद्याचे बियाणे व इतर पिकांचे बियाणे जादा भावाने खरेदी करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाच्या भरवश्यावर पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, ते विहिरीचे पाणी देत आहेत. परंतु ज्यांच्याकडे काहीच व्यवस्था नाही ते मात्र अद्यापही हातावर हात मांडून बसले आहेत.
राख येथील शेतकरी विनायक पवार यांनी पहिल्या दोन-तीन पावसांनंतर बाजरी पेरली. आता पावसाची नितांत गरज आहे. जमिनीत ओल आहे, पण मातीच्यावर तापमानत प्रचंड उष्णता असल्याने कोंब जळत आहेत. या दिवसात आभाळ भरलेले असते. उन्हाची तीव्रता नसते, रिमझिम पावसाच्या सरी पडत असतात. त्यामुळे बाजरी हे पिक पावसाच्या पाण्यावरच येते; पण पावसाने दडी मारल्याने बाजरीची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.
०१ नीरा
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून बाजरीची पेरणी केली, पण कडक उन्हाने उगवण क्षमतेवर परिणाम होत आहे.