पुणे : दिवसभर ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर शहराच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी गारांचा जोरदार वर्षाव पाहायला मिळाला. खडकवासला परिसरात दुपारी जोरदार वा-यासह पाऊस झाला. शुक्रवारीही शहरात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कर्नाटकापासून विदर्भपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम आज पुणे शहरात दिसून आला. गुरुवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. दुपारनंतर जोराचा वारा सुरू झाला. दुपारी ३ वाजल्यानंतर पूर्व भागातील वानवडी, कोंढवा, हडपसर, येरवडा परिसरात पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारांचा वर्षाव सुरू झाला. गारा गोळा करण्याबरोबरच अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. मार्केट यार्ड, बिबवेवाडी परिसरात जोराचा पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावरुन पाणी वाहताना दिसत होते. गंगाधाम चौकात पावसाच्या पाण्यामुळे तळ साचले होते.
पश्चिम भागात मात्र अतिशय तुरळक पावसाचा शिडकावा झाला. डेक्कन, कोथरूड, गोखलेनगर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत तुरळक पावसाची नोंद झाली होती. कात्रज, कोथरूड येथे १ मिमी पावसाची नोंद झाली.
पुणे शहरात शुक्रवारी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.