पुणे : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आज (दि.९) वरूणराजाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली. लातूर, बुलढाणा, अकोला, वर्धा, परभणी, अमरावती व इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात पाऊस व गारपीटाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवेची चक्रीय स्थिती सध्या महाराष्ट्राच्या मध्य भागावर आहे. कोकण गोव्यात पाच दिवस हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात नगर, सांगली व सोलापूर येथे ११ व १२ एप्रिल रोजी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाटही होईल. विदर्भात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होईल. राज्याच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवस काही बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात घट होईल. पुण्यात १३ एप्रिल पर्यंत आकाश निरभ्र आकाश राहील. दुपारी व सायंकाळी ढगाळ वातावरणाची देखील शक्यता आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज असल्याने कमाल तापमान हे ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले गेले. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर नगरला सर्वात कमी किमान तापमान १८.३ अंशावर होते.
राज्यातील पाऊस
परभणी - ४ मिमीअकोला - २ मिमीबुलढाणा - २ मिमीवर्धा - ६ मिमी