या योजनेमुळे पाण्याचे महत्व काय आहे, यापेक्षा घरातच, ते पण पावसाचे पडलेले पाणी साठवून त्याचा प्रत्यक्षात वापर सध्या करू लागले असल्याची माहिती सरपंच मंगल कोरडे, उपसरपंच जयसिंग पवळे यांनी दिली. वाकळवाडी गावासाठी युनायटेड बे या कंपनीच्या वतीने सचिन उपाध्याय ग्रामसेविका अनिता आमराळे यांनी हा रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्ट उभारण्यासाठी प्रयत्न केल्याने महिलांना आता पावसाळ्यात निदान पाण्यासाठी शोधाशोध करण्याचे थांबल्याचे दिसत आहे. युनायटेड बे कंपनीने हा संपूर्ण प्रोजेक्ट स्वखर्चाने राबवला, तर कौटुंबिक सहभागातील टाकी बांधण्यासाठी जमीन खोदण्यासाठी एक हजार रुपये घेतले. लोकसहभागातून आणि कुटुंबाने दाखवलेल्या इच्छेमुळे पाच-दहा नव्हे, तर ६० कुटुंबांनी प्रत्यक्ष सहभाग घेत पावसाळ्यात पाण्याची सोय केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
या रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्टचा लोकार्पण सोहळा नुकताच युनायटेड बे कंपनीच्या संचालकासह ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाला. या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये ज्या ठिकाणी पत्र्याचे छत अथवा स्लॅबच्या छताचा वापर करण्यात आला. कंपनीच्या वतीने छतापासून पाणी गोळा करण्यासाठी पीव्हीसी पाईपचा वापर करून हे पाणी साठवण्यासाठी तीन हजार लिटरची बंदिस्त सिमेंटची पाण्याच्या टाकीसह टाकीतून पाणी घेण्यासाठी झाकण ठेवले तर हवेच्या आर्द्रतेने टाकीला आतून शेवाळ तयार होत असते ते होऊ नये म्हणून पूर्ण टाकी बंदिस्त करण्यात येऊन टाकीवर पाणी उपसण्यासाठी छोटासा हातपंप बसवण्यात आल्याचे पाहावयास मिळत आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून युनायटेड बे कंपनीच्या सीएसआर फंडातून राबवलेला रेन हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट निश्चित पूर्व भागातील अवर्षण गावांना फायद्याचा ठरणार आहे.
६० कुटुंबांसाठी राबवण्यात आलेल्या रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्ट अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा मिळून ६३ ठिकाणी चांगल्या दर्जेदार पद्धतीने उभारण्यात आलेले प्रोजेक्ट इतर गावांना आदर्श ठरणार आहे.