पुणे : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे व एसटी वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईतून येणाऱ्या बहुतेक रेल्वेगाड्या दीड ते दोन तास विलंबाने पुण्यात पोहचल्या. तर बहुतेक एसटी बसही उशिराने धावत होत्या. त्यामुळे काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पुढील दोन दिवस प्रगती व सिंहगड एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सकाळपासूनच वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पावसाने प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस व पुणे ते पनवेल पॅसेंजर या गाड्या दि. २९ व ३० जून रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुसावळ-पुणे एक्सप्रेस ही गाडी दोन्ही दिवस दौंड, मनमाड मार्गे धावेल. शुक्रवारी मुंबईहून येणाऱ्या प्रगती एक्सप्रेस एक तास, डेक्कन क्वीन पाऊण तास तर सिंहगड एक्सप्रेस २ तास २० मिनिटे उशिराने पुण्यात पोहचली. तसेच नागरकोईल, चेन्नई मेल, पनवेल पॅसेंजर, कोनार्क, कन्याकुमारी एक्सप्रेस या गाडयाही दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या.
पुण्यातून शिवाजीनगर, स्वारगेट व पुणे स्टेशन स्थानकातून मुंबई व ठाण्याकडे बस सोडण्यात येतात. पावसामुळे दुपारनंतर बस वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. पुण्यातून दुपारपर्यंत बहुतेक बस वेळेत सुटल्या. मात्र, मुंबईतील पावसाने या बस मुंबईत पोहचण्यास उशीर झाला. तसेच तिथून सुटण्यासही उशीर झाल्याने या गाड्या पुण्यात दोन ते तीन तास विलंबाने पोहचत होत्या. त्यामुळे जवळपास २५ टक्के फेºया रद्द कराव्या लागल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.