पुणे : उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना गुरुवारी (९ जून) पूर्व मोसमी पावसाच्या थेंबांनी काहीसा दिलासा मिळाला. वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला हाेता. पावसाळ्याची चाहूल लागली असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शहरात येत्या चार दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेला आठवडाभर आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असल्याने तापमानात वाढ झाली हाेती. त्यामुळे पुणेकरांना घामाच्या धारा लागल्या होत्या. उन्हाच्या झळा असह्य होत होत्या. शहरात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ उन्हाचा चटका जाणवला. त्यानंतर ढगांनी गर्दी करत वातावरण आल्हाददायक बनविले. सायंकाळी शहराच्या अनेक भागांत तुरळक पाऊस पडला.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसांत शहरात हवामान सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात गुरुवारी कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा ते १.३ अंशांनी जास्त होते. किमान तापमान २३.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.