पुणे : यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने, जूनमध्ये पावसात खंड राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस असून, संपूर्ण मान्सून काळात यंदा पाऊस १०१ टक्के होणार आहे, तसेच दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस होणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला. त्यात देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, साबळे यांनी त्यांच्या मॉडेलचा अंदाज जाहीर केला, त्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील ८४ ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल व किमान तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार, राज्यात १०१ टक्के पावसाचा शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र, यंदा वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेरणीची घाई करू नये
जूनमध्ये पावसात खंड पडणार असल्याने, शेतकऱ्यांनी जमिनीत ६५ मिलिमीटर म्हणजेच अडीच ते तीन फूट ओलावा असल्याशिवाय पेरणीला घाई करू नये, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे खान्देश, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूस व सोयाबीनची लागवड करण्याची घाई करू नये. जिरायती शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवड करावी, असेही ते म्हणाले.
हवामान बदलाचा परिणाम
राज्यात गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पावसात खंड पडत आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत आहे. गेली दोन वर्षे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत महापूर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही आता हवामान बदलाला प्रवण राज्य झाले आहे. त्या दृष्टीने पीक बदल करायला हवा व नियोजन करावे, असेही ते म्हणाले.