पुणे : बिहार ते दक्षिण तामिळनाडु दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे यापुढील ४ दिवस राज्यात कोकणासह सर्वत्र वादळी वार्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
गेल्या २४ तासात सातारा येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभरात सातारा येथे ४ मिमी पाऊस झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ ते ३० एप्रिल दरम्यान तसेच रायगड जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे.
पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान जोरदार वारे, वीजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात २८, २९ व ३० एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात २९ व ३० एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ....पुण्यात पावसाचा शिडकावा....शहरात सोमवारी सायंकाळी काही भागात तुरळक पाऊस झाला. प्रामुख्याने शहराच्या पश्चिम भागातील काही उपनगरांमध्ये पाऊस झाला. आज दिवसभर आकाश अंशत: ढगाळ होते. दुपारनंतर वीजांच्या कडकडाट होताना दिसत होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी शिडकावा झाला तर काही ठिकाणी हलकी सर येऊन गेली. शिवणे परिसरात सुमारे अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. सिंहगड रोड परिसर, कर्वेरोड, कर्वेनगर, शिवाजीनगर भागात तुरळक पाऊस झाला. शहराच्या पूर्व भागात मात्र पावसाने हुलकावणी दिली.
पुढील चार दिवस शहरात आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.