पुणे : जुलैत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात २६ टँकर सुरू होते. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या ४० झाली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अद्याप पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून पुरंदर, शिरूर या तालुक्यात नव्याने टँकर सुरू करण्यात आले आहेत. पूर्वीच्या टँकर सुरू असलेल्या तालुक्यांपैकी भोर तालुक्यातील टँकर बंद केले आहेत.
जिल्ह्यात मार्चपासून पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाल्यानंतर टँकर सुरू झाले होते. त्यानंतर ही टँकरची संख्या ६० वर पोहोचली. मात्र, जुलैत चांगला पाऊस झाल्याने ही संख्या घटून २६ पर्यंत खाली आली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थिती कायम होती. मात्र, त्यानंतर दोन आठवड्यांत पावसाचा जोर ओसरल्याने पुन्हा पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.
जिल्ह्यात मार्चपासून आंबेगाव, खेड, जुन्नर आणि भोर तालुक्यात टँकर सुरू झाले होते. आता त्यात आणखी दोन तालुक्यांची भर पडली आहे. पुरंदर आणि शिरूर तालुक्यांमध्ये पाणीटंचाई स्थिती निर्माण झाल्याने त्या ठिकाणी अनुक्रमे ७ आणि १३ टँकर सुरू आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५ तालुक्यांमध्ये ४० टँकरने ३६ गावांसह २७१ वाड्या वस्त्यांमधील ९८ हजार २२४ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचवेळी पूर्वीच्या टँकर सुरू असलेल्या तालुक्यांपैकी भोर तालुक्यात पावसामुळे पाण्याची टंचाई स्थिती सुधारली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी टँकर बंद झाले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
आंबेगाव तालुक्यात सहा टँकरने सात गावांसह ४४ वाड्या वस्त्या, तर जुन्नर तालुक्यात सहा टँकरने पाच गावांसह ५८ वाड्या वस्त्या, खेडमधील ११ गावांसह ६२ वाड्या वस्त्यांमध्ये आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण ४० टँकरपैकी ३७ खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत २३ खासगी विहिरी ताब्यात घेण्यात आल्या असून टँकरच्या १४९ फेऱ्या झाल्या आहेत.
पुणे विभागातही १३६ टँकर-
पुणे जिल्ह्यापाठोपाठ सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या चार जिल्ह्यांमध्ये आजमितीला १३६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, कोल्हापूर येथील राधानगरी धरण भरल्याने तेथील पाण्याची चिंता सध्या मिटली आहे. सातारा जिल्ह्यात ६१ टँकरने ५६ गावांसह ३४३ वाड्या वस्त्यांना तर सांगली जिल्ह्यात २७ टँकरने २३ गावांसह १६९ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात नऊ गावांसह ७४ वाड्या वस्त्यांना नऊ टँकर सुरू आहेत.