पुणे: राज्यात गेल्या आठवड्याहून अधिक काळ कोकणाला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता कमी झाला आहे. पुढील दोन दिवस कोठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने कोठेही अलर्ट दिलेला नसून विदर्भात काही जिल्ह्यात २३ व २४ जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रविवार सकाळपर्यंत कोकणातील पेडणे १९०, माथेरान १२०, सावंतवाडी १००, दोडामार्ग, मंडणगड ९०, केपे, सुधागड, पाली, वैभववाडी, वाल्पोई ८० मिमी पावसाची नोंद झाली होती. या शिवाय सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ११०, चांदगड, लोणावळा, महाबळेश्वर ९०, राधानगरी, त्र्यंबकेश्वर ६०, आजारा, गारगोटी, हर्सूल, पन्हाळा, शाहूवाडी ५०, वडगाव मावळ ४० मिमी पाऊस झाला. याबरोबरच काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
मराठवाड्यातील आष्टी, गंगाखेड, हिंगोली, पारंडा, वाशी १० मिमी पाऊस पडला. विदर्भातील गोरेगाव, तिरोरा २०, देवरी, लाखनी, मोर्सी, तुमसर १० मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरील कोयना (नवजा) १७०, अम्बोणे १००, कोयना (पोफळी), शिरगाव ७०, खोपोली, वळवण ६०, ताम्हिणी, डुंगरवाडी ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात कोल्हापूर, महाबळेश्वर, मुंबई, सांताक्रूझ, पणजी, डहाणु, पुणे, ब्रम्हपूरी, वर्धा येथे हलका पाऊस झाला.
पुढील दोन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ व २४ जून रोजी चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या पाच जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.