लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणेकरांना रविवारी काहीसा दिलासा मिळाला. जवळपास १० दिवसानंतर शहरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. शहरात रात्री साडेआठ वाजेपर्यंत १०.६ मिमी पाऊस झाला होता. उपनगरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
शहरात गेल्या दोन -तीन दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरु होता. कडक ऊन असताना अचानक पावसाची हलकीशी सर येत होती. ५ जून रोजी दिवसभरात शहरात १०.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज प्रथमच १० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
रात्री आठ वाजेपर्यंत खडकवासला ९.५, कात्रज ४.६, वारजे ३.६, कोथरुड १८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरात आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.