लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेले काही दिवस कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर ओसरला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकणातील सुधागड पाली ९०, पोलादपूर ७०, वैभववाडी ६०, मंडणगड, माणगाव, माथेरान, म्हसळा, पेण, रामेश्वर, सावंतवाडी ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर १९०, गगनबावडा १२०, राधानगरी ९०, लोणावळा, शाहूवाडी, तळोदा, त्र्यंबकेश्वर ७०, ओझरखेडा ६०, भोर ५० मिमी पाऊस झाला. तसेच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला होता.
मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
घाटमाथ्यावरील ताम्हिणी १८०, डुंगरवाडी, दावडी १३०, भिरा ११०, शिरगाव १००, अम्बोणे ६०, वळवण ५० मिमी पावसाची नोंद झाली होती.
रविवारी दिवसभरात महाबळेश्वर ३५, रत्नागिरी १५, पणजी ८, अलिबाग, पुणे, जळगाव ४, कोल्हापूर, सातारा ३, गोंदिया ६ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नगिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.