पिंपरी : मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्यासह किवळे, मारूंजी, रावेतसह मावळ परिसरात अनेक ठिकाणी सोमवारी तासभर झालेल्या पावसाने झोडपून काढले. परिणामी शेतकऱ्यांसह चाकरमान्यांची पुन्हा चांगलीच तारांबळ झाली. शहरात काही भागात सोमवारी पावसाच्या सरींचा शिडकावा झाला. त्यामुळे तापमानात चांगलीच घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे.रविवारी उघडीप झाल्यामुळे पाऊस परतणार नाही, असे चित्र असतानाच सोमवारी दुपारनंतर पुन्हा ढग दाटून आले. सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक जोरदार वारे वाहू लागले. क्षणार्धात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. थेरगाव, वाकड, ताथवडे, चिंचवड, आकुर्डी, रावेत, पुनावळे, मारूंजी, मामुर्डी, किवळे या भागात तासभर जोरदार पाऊस झाला. थोड्याच वेळात रस्त्यांवरून, सखल भागातून पाणी वाहू लागले. शहरातील दापोडी, खडकी, कासारवाडी, पिंपरी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळनंतर सुटलेला थोडा वारा व झालेला पाऊस यामुळे शहर परिसरात तापमानात घट झाल्याचे जाणवत होते. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. शहरातील तापमान व हवेच्या प्रदूषणाची माहिती सतत समजली जावी, यासाठी पिंपरीच्या थिसेनक्रुप चौकात उभारलेला डिजिटल माहितीफलक २ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील वातावरणाची माहिती मिळण्याबाबत नागरिकांची गैरसोय होत आहे. चौकामध्ये असलेल्या या फलकामुळे नागरिकांना वाहनांमधून अथवा पायी जातानाही सहजगत्या दृष्टिक्षेपात तापमान, हवा प्रदूषणाची माहिती समजायची. मात्र आता ते बंद असल्याने नित्यनेमाने माहिती पाहणाऱ्यांना चुकल्या-चुकल्यासारखे जाणवू लागले आहे. फलक पुन्हा सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
पावसाने झोडपले
By admin | Published: November 18, 2014 3:33 AM