जुन्नर तालुक्याचे पूर्व भागात या वर्षी मोसमी पावसाने गती न पकडल्याने वेळोवेळी पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, आळेफाटा, आळे, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, उंचखडक, बोरी, गुंजाळवाडी, बेल्हा व पठार भागात खरीप पिके वेळोवेळी सुकण्याचे अवस्थेत आली होती. माळरानांवरील चाराही योग्य प्रमाणात वाढला नव्हता.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा ओढ दिली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली व रात्रभर हा पाऊस बरसला. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. या पावसाने पक्व अवस्थेत आलेल्या खरीप पिकांना फायदा होणार असल्याचे मनीष कुटे, राजकुमार कुटे, राजेंद्र गाजरे (पिंपरी पेंढार) व विनायक आहेर, माऊली संभेराव (आणे) या शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र या भागातील ओढे, नाले या पावसाने खळखळून वाहिले नाही.