पुणे - मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अनेक भागात पाणी साचलं आहे. सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक अडकून पडले आहेत. पूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. त्याशिवाय अनेक घर, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. डेक्कन भागातही घरांमध्ये पाणी घुसलं आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेसनं विसर्ग सुरू असल्याने पुण्यात जलप्रलय आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात डेक्कन परिसरात पुलाची वाडी याठिकाणी लोकांच्या घरात ३-४ फूट पाणी शिरलं आहे. घरातील अनेक वस्तू पाण्यात वाहत आहेत. धान्य, लहान मुलांची पुस्तके सगळे काही पाण्यात भिजलं आहे. घरातील सामान बाहेर काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. त्यात या परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं प्रतिक्रिया दिली की, माझ्या घरात खूप पाणी शिरलं आहे. त्यामुळे मुलांची अभ्यासाची पुस्तके, घरातील टीव्ही आणि अन्य सगळं सामान पाण्यात गेले आहे. मी एकटी घरकाम करते, माझ्या घरात कमावणारं कुणीच नाही. निदान आम्हाला नदी पात्रात पाणी सोडणार असल्याची कल्पना तरी द्यायची. आम्हाला कुणीच काहीच सांगितले नाही. मध्यरात्री ३ च्या सुमारास आम्ही झोपेत असताना पाणी घरात आलं आहे असं त्यांनी म्हटलं.
पुण्यात पुराचा धोका, सांगली-कोल्हापूरातही पूरस्थिती; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
तसेच पाणी घरात शिरताच आधी लहान मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आवश्यक दाखले, कागदपत्रे घेऊन काही बाहेर पडले. काही घराला लोकांनी लॉक लावून बाहेर पडले परंतु घरात पाणी शिरले आहे. घरातील भांडी, इतर गोष्टी पाण्यात तरंगताना दिसत आहे. काही माणसं आजारी आहेत त्यांना भिजलेल्या कपड्यांवर बाहेर बसवलं आहे. ३ वाजल्यापासून या भागातील लोक पूरातून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. पुलाची वाडी येथे ७० घरे आहेत, या सर्व घरात पुराचे पाणी शिरले आहे.
मुसळधार पावसामुळं मुंबईच्या रस्त्यांवर साचलं पाणी, वाहतूक मंदावली
दरम्यान, पुण्यात नदीकाठच्या भागांमध्ये पाणी वाढल्याने पूरजन्य चित्र निर्माण झालं आहे. नागरिकांनी दक्षता बाळगावी, गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पूरामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ज्याठिकाणी लोक अडकलेत तिथे रेस्क्यू टीमद्वारे बोटीने नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे. येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.