लोणावळा : लोणावळा शहरामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुधवारी (25 जुलै) रोजी 24 तासांमध्ये लोणावळा शहरात विक्रमी 370 मिलिमीटर (14.57 इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर 145 मिलिमीटर तर रात्रीच्या सुमारास 225 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे व त्या स्वरूपाचा पाऊस देखील लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये मागील 24 तासापासून सुरू आहे. आज देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. लोणावळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
18 जुलैपासून लोणावळा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर मागील 48 तासापासून पावसाने लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे लोणावळा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून पवना धरणांमध्ये 68 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाणेमावळातील वडिवळे धरण हे पूर्ण भरले असून धरणांमधून 7000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सर्वच ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील सर्व शाळांना 25 जुलै रोजी विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली असून लोणावळा नगरपरिषद हाती मधील शाळांना 25 व 26 जुलै रोजी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने व शिक्षण मंडळाच्या वतीने विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुर परिस्थिती
मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक रहिवासी भागांना पाण्याचा विळखा पडला आहे. वाहतुकीचे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पाण्यातून वाहने घेऊन जावे लागत आ.हे तसेच पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये पावसाच्या सोबत जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत तेव्हा नागरिकांनी झाडांचा आसरा घेऊ नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील कार्ला, मळवली, सदापूर, पाटण, देवले, बोरज या भागांना इंद्रायणी नदीच्या पूराचा विळखा बसला असल्याने नागरिकांनी पाण्यामधून वाहने घेऊन जाऊ नयेत असे देखील आवाहन करण्यात आले आहे.