पुणे – राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील निमगाव केतकी गावात पूर आल्याने ५५ जण अडकले होते, यातील ४० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं असून अद्याप १५ जण पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. इंदापूरनजीक २ दुचाकीस्वारांना वाचवण्यात यश आल्याचं बारामतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. सोलापूर येथे उजनी धरणातून २ लाख क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण, डाळज, पळसदेव आणि इंदापूर येथे उजनी धरणाचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. सोलापूरकडे जाणारी वाहने लोणी काळभोर येथे थांबवण्यात आली होती. उजनी धरणातून तब्बल दोन लाख वीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
पळसदेव ते लोणी देवकर दरम्यानच्या ओढ्याला मोठा पूर आल्याने काही काळासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. ओढ्याला मोठा पूर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. भिगवणजवळ भादलवाडी येथेही रस्त्यावर सुमारे साडेतीन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरा पाणी कमी झाल्यानंतर टप्याटप्याने वाहतूक सुरू करण्यात आली.
बारामती आणि इंदापूर तालुक्यांत बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे पुराचा मोठा तडाखा बसला. अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले, घरांमध्येही पाणी शिरले.त्याच मुळे पुणे सोलापूर हायवेची वाहतूक ठप्प झाली होती.
पुण्यातील इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचले, पाण्यात वाहून जाणाऱ्या माणसाला जेसीबीच्या सहाय्याने वाचवण्यात आले. बारामतीमध्ये अनेक घरात पुराचे पाणी शिरले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
तसेच पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिराच्या रोडला नदीचं स्वरुप आलं होतं, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.