पुणे : अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरला आहे. त्यामुळे येत्या सहा दिवसांत कोकण व गोव्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
तसेच विदर्भात पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे शहर व परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अलिबाग येथे सर्वाधिक ४२ मिमी आणि नगर ३३, डहाणू १८, सांताक्रुझ १२, मुंबई ५, लोहगाव २, महाबळेश्वर २, रत्नागिरी ४, पुणे ०.२ मिमी पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.