पुणे : गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असून, पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अहमदनगर येथे ३५़२ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
मध्य महाराष्ट्राच्या सर्व भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे़ कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणच्या कमाल तापमानात घट झाली आहे़ मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे़ मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात १२ व १३ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ विदर्भातील भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी १२ व १३ मार्च रोजी पावसाची शक्यता असून नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांत १२ मार्च रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़