बारामती : ‘पाण्यासाठी मोर्चा काढला.. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा प्यायचं पाणी तरी मिळालं. विहिरीचं पाणी खारट लागतं.. जनावरंसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत. खारट पाण्यामुळे जनावरांचं दूध कमी आलं. गावात चारा मिळत नाही, टनाला २ हजार ७०० रुपये देऊन बागायती भागातून ऊस आणावा लागतो. तेव्हा कुठं जनावरं जगत्यात.’ बारामतीच्या जिरायती भागात सर्वत्रच अशा प्रतिक्रिया ऐकण्यास मिळतील. सलग चार वर्षे दुष्काळ या भागात ठाण मांडून बसला आहे. पुढील दोन महिने सरले की, या भागावर नववर्षाच्या सुरुवातीला पाणी पाणी... करण्याची वेळ येणार, असेच चित्र सध्या या भागात दिसते. बारामती तालुक्यातील अंजनगाव, जळगाव सुपे, कऱ्हा वागज, जळगाव कडेपठार या गावांमध्ये दुष्काळाच्या झळा नोव्हेंबर महिन्यातच गडद झाल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी हातची पिकं सोडून दिली आहेत. जळगाव सुपे येथील खोमणेवस्ती परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकर सुरू आहे. येथील विहिरींचे पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यास योग्य नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच, सध्या परिसरात चारा पिके दिसतात. विहिरींच्या पाण्यावर ती जोपासली जात आहेत. मात्र, क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनी खारपड होण्याचा धोका असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. चारा पिके घेण्याशिवाय पर्याय नाही. दूध दर पडले. चाऱ्याच्या किमती आवाच्या सवा असल्याने हातात पैसा टिकणे अवघड झाले आहे. जनावरं विकावी म्हटलं तर कोणी घेईना, असे येथील तरुण दूध उत्पादकांनी सांगितले. या भागामध्ये सिंचनाची कोणतीही कायमस्वरूपी सुविधा नाही. पाऊस चांगला झाला, कऱ्हा नदी वाहू लागली आणि बंधारे भरले तरच या भागात आबादी आबाद असते; मात्र मागील चार वर्षांपासून पावसाने जिरायती भागात तोंड दाखवले नाही की कऱ्हा नदीही वाहिली नाही. त्यामुळे बंधारे तर सोडाच; परंतु ओढ्यावरील डबकीदेखील भरली नाहीत. त्यामुळे येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. पशुधन जगवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची कसरत होत आहे. चाऱ्याबरोबरच जनावरांची तहान भागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांना स्वीकारावे लागत आहे. जिरायती भागात चरित्रार्थासाठी दूध व्यवसाय महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊनही हा व्यवसाय चालवावा लागत आहे. चारा आणि पाण्याच्या गंभीर समस्येतून जनावरांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दावण रिकामी होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी पाणी रे!
By admin | Published: November 27, 2015 1:36 AM