पुणे : शहरात सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. डेंगी, चिकुनगुनिया, फ्लू या साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्टमध्ये तापाच्या रुग्णांच्या संख्येत तब्बल चार ते पाच पटींनी वाढ झाली आहे.शहरात ८ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. विविध भागांत टायर, काचेच्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, सोसायट्यांमध्ये पाण्याची डबकी साचली आहेत. पावसाच्या या स्वच्छ पाण्यात डेंगी पसरविणाºया डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीमध्ये समोर आले आहे. यामुळेच पुणे शहर आणि परिसरात ऐन गणेशोत्सावामध्येच साथीच्या रोगांनी आपले डोके वर काढले आहे. डेंगी, चिकुनगुनिया, ताप, एच वन-एन वन, लॅप्टोसारख्या रोगांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालायांत दररोज तापामुळे हैराण झालेले रुग्ण दाखल होत आहेत. महापालिकेच्या वतीने आॅगस्ट महिन्यात शहरातील विविध सोसायट्या, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा, शासकीय कार्यालयांच्या आवारामध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये अनेक ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्तीकेंद्रे असल्याचे निदर्शनास आले. यामुळेच गेल्या महिन्यात डेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या तब्बल पाच पटींनी वाढली आहे़
पावसाच्या लपंडावामुळे तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:37 AM