लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. विशेषता सातगाव पठार भागातील बटाटा पिकाला फटका बसणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, मंचर परिसर याला अपवाद ठरला आहे. पावसाचे वातावरण झाले आहे. आकाश ढगांनी भरून येते. दोन-तीन दिवस तुरळक सरी कोसळल्या. मात्र दोन दिवस झाले पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. गुरुवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. त्यामुळे सध्या पावसाळा आहे की उन्हाळा असा प्रश्न पडला आहे. खरिपातील पिकांना पावसाची नितांत आवश्यकता आहे. विशेषता अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची पेरणी केली आहे. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या सातगाव पठार भागातील बटाटा पीक धोक्यात आले आहे. या भागात लागवड क्षेत्रात ५० टक्के घट झाली आहे. जी लागवड झाली, तेथील बटाटा पिकाची पावसाअभावी अद्याप उगवण झालेली नाही. दोन दिवसात पाऊस पडला नाही. यामुळे बटाटा पिकाला फटका बसेल अशी माहिती उत्पादक अशोकराव बाजारे व जयसिंग एरंडे यांनी दिली.
चौकट
नगदी पिकांना पावसाची नितांत आवश्यकता आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाऊस पडत नाही हे पाहून नगदी पिकांना पाणी भरण्यास सुरुवात केली आहे. ऐन पावसाळ्यात वीज पंप सुरू करून शेतकरी पिकांना पाणी भरत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. डिंभे धरणात खूपच कमी पाणीसाठा आहे. बहुतेक ठिकाणी तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
चौकट
दोन दिवसात पावसाला सुरुवात झाली नाही. तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असते. या भागात पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
फोटोखाली: पाऊस पडत नसल्याने नगदी पिकांना शेतकऱ्यांना पाणी भरावे लागत आहे.