बारामती : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बारामती शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. जिरायती भागात मात्र काही गावे वगळता तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील जिरायती भागात दुष्काळी स्थिती ‘जैसे थे ’ आहे. तर, इंदापूरच्या पश्चिम भागात आजच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.बारामती शहर परिसरात रविवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असताना बारामती, इंदापूरकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे परिसरावर चिंतेचे सावट कायम आहे. तालुक्यातील काटेवाडी, ढेकळवाडी, खताळपट्टा, पिंपळी, जळोची, रुई, सावळ येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. बारामतीच्या जिरायती भागातील काऱ्हाटी, माळवाडी, फोंडवाडा, बाबुर्डी, भिलारवाडी, पानसरेवाडी भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. तर, सुपे भागात मध्यम पाऊस झाला. या भागातील पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. जोरदार पावसाची गरज आहे. दरम्यान, बारामतीच्या बागायती भागातील वडगाव निंबाळकर, सोमेश्वरनगर भागात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र होते. सणसर (ता. इंदापूर) येथील आठवडे बाजारात जोरदार पावसाने सर्वांची त्रेधा उडाली.भाजीपाला, बाजार खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी मिळेल त्या आडोसाचा आधार घेतला. अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधा उडाली. बोरी (ता. इंदापूर) परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी चारच्या सुमारास एक तास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. आज अचानक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ झाली. शेतात काही ठिकाणी पाणी साचले होते. शेतातला मका, बाजरी,ऊस अशा अनेक पिकांना दिलासा मिळाला आहे.