पुणे : संपूर्ण जून महिन्यात पुणे जिल्ह्याला असणाऱ्या पावसाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. रविवारी एकाच दिवसात शहरातील धरणांमध्ये एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा झालेले बघायला मिळाले असून पाण्याच्या पातळीने मागील वर्षाची आकडेवारी केव्हाच उलटली आहे.
यंदा जून महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.त्यामुळे पुरेसा पाऊस पडला नाही तर शहरावर वर्षभर पाणी पुरवण्याचे आव्हान असेल असेही तज्ज्ञांनी सांगितले होते. सुदैवाने या सर्व शक्यता धुळीला मिळवत गेले दोन दिवस धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. इतकेच नव्हे तर मागील वर्षीच्या आकडेवारीलाही मागे टाकत यंदा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.मागीलवर्षी आजच्या दिवशी खडकवासला धरण साखळीचा पाणीसाठा २७.६ टक्के इतका होता. त्यावेळी एकूण पाणीसाठा ७.८९ टीएमसी होता.शनिवार रविवार झालेल्या पावसाने चारही धरणे २९.१७ टक्के भरली असून सध्या ८.५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. खडकवासला धरण ५१.९९ टक्के भरले असून त्याखालोखाल पानशेत धरण ४३.३८ टक्के भरले आहे. या पावसामुळे शेतीला आधार मिळाला असून भात लावणीला वेग आला आहे.या पावसावर सुमारे ४० लाख लोकसंख्येचे पुणे शहर आणि जिल्ह्यातील शेतीचा मोठा भाग धरणक्षेत्राखाली येत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.