पुणे : मॉन्सून यंदा १०० टक्के बरसणार असा अंदाज हवामान विभागाने जूनच्या सुरुवातीलाच जाहीर केला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशभरात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून पुणे शहरात पावसाने चार महिन्यांची सरासरी ओलांडली आहे.पुणे शहरात दरवर्षी पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात सरासरी ५६० मिमी पाऊस पडतो.यंदा २२ ऑगस्टपर्यंत ५७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २२ ऑगस्टपर्यंत पुणे शहरात सरासरी ६१३ मिमी इतका पाऊस पडत असतो. यंदा सरासरीपेक्षा तब्बल १६२ मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शहरात जोरदार पाऊस पडला होता. त्यानंतर ठराविक दिवस शहरात पावसाने हजेरी लावली आहे.पहिल्या आठवड्यानंतर तिसऱ्या आठवड्यात शहरात जोरदार पाऊस झाला होता. जून महिन्यात तब्बल १९ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात शहरात अनेक दिवस पावसाचा खंड असतो. यंदा मात्र जुलै महिन्यात १८ दिवस पावसाचे होते. पहिले दोन आठवडे व त्यानंतर २३, २४, २५ जुलैला जोरदार पाऊस झाला होता. जुलै महिन्यात १२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलैमध्ये कमी पाऊस झाला असला तरी १ ऑगस्ट रोजी शहरात सरासरीच्या तुलनेत २१़९ मिमी अधिक पाऊस बरसला होता. ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रातील वारे बळकट झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातही जोरदार बरसात झाली असून त्यामुळे चार महिन्यातील सरासरी यंदा पावसाने एका महिना बाकी असतानाच ओलांडली आहे. ऑगस्ट महिन्यात देशभरात १०१ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.पुणे शहरात वर्षभरात सरासरी ७६४ मिमी पाऊस होतो. हे पाहता गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पावसाची वर्षाची सरासरी चार महिन्यातच ओलांडण्याची शक्यता आहे. लोहगाव येथे आतापर्यंत ६१.०४ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीपेक्षा २६६ मिमीने अधिक आहे.
पुण्यात पावसाने चार महिन्यांची सरासरी ओलांडली अडीच महिन्यांत ;आतापर्यंत ५७२ मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 10:41 PM
यंदा देशभरात सर्वत्र चांगला पाऊस..
ठळक मुद्देयंदा सरासरीपेक्षा तब्बल १६२ मिमी अधिक पावसाची नोंद