पुणे, दि.31 - तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. त्यातील काही ढगांची उंची ही ९ किलोमीटरपर्यंत गेली होती़.पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘२७ आॅगस्टला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. ते २८ आॅगस्टला छत्तीसगडला आले. २९ आॅगस्टला मध्य प्रदेशाच्या पुढे आले. त्याच वेळी अरबी समुद्रातून दुस-यांदा अतितीव्र स्वरूपाची ढगनिर्मिती होत होती़. याचा परिणाम होऊन मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाली़ काही ढगांची उंची ही ९ किमीपर्यंत होती़ पण, चक्रीवादळात, गडगडाटासह वादळी पावसाच्या काळात ढगांची उंची १२ ते १४ किमी असते़’’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘‘मुंबईपासून ५० किमी अंतरावर समुद्रात या ढगांची निर्मिती झाली़ जमिनीपासून साधारण १ कि. मी.वर ढग सुरू होतात. तेथून पुढे त्यांची उंची १२ किमी होती़ काही ढग हे ८ ते ९ किमी उंचीचे होते़ यात सातत्य असल्याने केवळ मुंबईच नाही तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झाला़ सर्वसाधारणपणे ढगांची उंची ही ८ किमीपर्यंत गेल्यानंतर त्यात वीज व गारांची निर्मिती होती. त्यामुळे या ढगांमधून समुद्रात वीज पडण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्याची नोंद मुंबईतील रडारवर नोंदविली गेली आहे.’’२००५च्या तुलनेत एकतृतीयांश पाऊस...डॉ. कुलकर्णी यांनी २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाचाही अभ्यास केला होता़ याबाबत त्या वेळी ढगांची निर्मिती मुंबईच्या जवळ झाली होती; त्यामुळे समुद्रात पडणारा पाऊस कमी झाला व तो सर्व मुंबईमध्ये झाला़ २००५मध्ये ढग निर्माण होण्याची प्रक्रिया ही दिवसभर सुरू होती़. त्यामुळे तेव्हा ९४४ मिमी पाऊस झाला होता़ तेव्हाच्या तुलनेत यंदा पडलेला पाऊस हा ३० टक्केच आहे.
पावसाचे धुमशान : कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेने मुंबईवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 3:43 AM