- रूपेश बुट्टे पाटील, शेलपिंपळगावआंबेठाण : सध्या जिल्ह्यासह तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. खेड तालुक्याच्या औद्योगिक वसाहतीच्या भागात जमिनीच्या मिळालेल्या पैशामुळे ऐन पावसाळ्यात पाण्याऐवजी पैशांचाच पाऊस पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हक्काचे मतदान सोडून इतर मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी साम-दाम-दंड यांसह मोठ्या प्रमाणात आमिषे दाखविली जात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत एक नवा ट्रेंड अनुभवायला मिळत आहे.खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात एमआयडीसीसाठी जमिनी संपादित झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जवळपास चार टप्पे तालुक्यात उभारले गेले आहे. याशिवाय, आळंदी-मरकळ परिसरात असणारे कारखाने आणि दावडी येथे उभारला जात असलेला एसईझेड प्रकल्प यामुळे जवळपास अर्धा तालुका औद्योगिक वसाहतीच्या छायेखाली येत आहे आणि ज्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी संपादित झाल्या नाहीत, त्यांच्या जमिनीला आलेला सोन्याचा भाव व त्यांची विक्री करून मिळालेला माल या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचा प्रचंड पैसा मिळाला आहे. त्यामुळे पैसा आहे; आता फक्त सत्ता आणि पद हवे म्हणून पाण्यासारखा पैसा तालुक्यात उधळला जात आहे.चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक २ मध्ये तर एका मताला पाच हजार ते दहा हजार रुपयांचा भाव फुटला आहे. एखाद्या व्यक्तीकडे ठोस मतदान असेल, तर त्याच्याकडे १ लाख ते ५ लाख रुपयांची रक्कम सोपविली जाते. याशिवाय ज्या उमेदवाराचे जे चिन्ह आहे, त्या उमेदवाराकडून त्या वस्तू मतदारराजाला वाटण्याचे काम सुरू आहे. यामध्ये नारळ चिन्ह असणारा उमेदवार नारळाची पोती आणून गावात रिकामी करीत आहे. ज्या उमेदवाराचे चिन्ह कपबशी आहे, तो उमेदवार कपबशांचे वाटप करीत आहे. ज्याचे चिन्ह कपाट आहे तो एका घरात एक कपाट भेट म्हणून देत आहे. अंगठी चिन्ह असणारा उमेदवार एक ते दोन ग्रॅम वजनाच्या अंगठ्या मतदारराजाला भेट देत आहे. या भागातील वासुली गावची निवडणूक तर अतिशय प्रतिष्ठा असणारी केली आहे. येथे एका घरात एक दुचाकी वाटप होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ज्यांचे निवडणूक चिन्ह गॅस सिलिंडर आहे, तो उमेदवार नवीन गॅस कनेक्शन घेऊन देण्याच्या घोषणा करीत आहे.अनेक ग्रामपंचायती या लहान असल्याने एका वॉर्डामधील मतदारसंख्या कमीत कमी १०० ते १२५ आहे. त्यामुळे अनेकांनी निवडून येण्याचे संख्याबळ आताच देवदर्शनासाठी बाहेरगावी हलविले आहे. तसेच, ज्या नागरिकांचे मतदान काठावर आहे, त्यांच्यावर उमेदवारांची विशेष नजर आहे. त्या मतदानासाठी काहीही करण्याची उमेदवाराची तयारी असल्याचे चित्र आहे.जमिनीचा पैसा जरी आज मिळाला असला, तरी सर्व शेतकरी आहेत. अगदी कालपरवापर्यंत ज्यांच्या घरी बैलांच्या दावणी बांधल्या जात होत्या, त्या उमेदवारांच्या घरी आज बकऱ्यांच्या दावणी दिसत आहे. काही गावांत तर एका दिवसाला दोन-दोन बकऱ्या कापल्या जात आहेत आणि किती कोंबड्या यमसदनी गेल्या, याची तर गणतीच होऊ शकत नाही.
ऐन पावसाळ्यात खेडमध्ये पाण्याऐवजी पैशांचा पाऊस
By admin | Published: July 31, 2015 3:51 AM