पुणे : दक्षिण गुजरात ते दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. ही स्थिती आता विरळ होत असून येत्या तीन दिवसांत कोकणात सर्वदूर पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, उर्वरित राज्यात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जोमदार पश्चिमी वारे, किनाऱ्यावरील कमी दाबाचा पट्टा तसेच हवेच्या समदाब रेषेमुळे वाढलेल्या मोठ्या दाबामुळे हा पाऊस होत आहे. पुढील २४ तासांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतरच्या तीन दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यानंतर ५ जुलैनंतर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. ५ जुलैच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी, ६ जुलैपासून राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती आयएमडीच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. मान्सून पंजाब, हरयाणा व राजस्थानच्या काही भागांत पोहोचला आहे.
पुण्यात पावसाची रिपरिप
शहरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या सरी येत होत्या. दुपारनंतर मात्र पाऊस थांबला, तर काही काळ ऊनही पडले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सुरू झालेला मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत शिवाजीनगर येथे ७.८, तर पाषाण येथे १०.१ मिमी पाऊस झाला, तर अक्षय मेझरमेंटने दिलेल्या आकडेवारीनुसार कात्रज २४, खडकवासला १३.५, वारजे ७.८, लोणी काळभोर ८ मिमी पाऊस झाला.
राज्यात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या २४ तासांत झालेला पाऊस : पुणे - ४.१, कोल्हापूर - ९, महाबळेश्वर २३, नाशिक २, सांगली ३, मुंबई २८, सांताक्रुज ५१, अलिबाग ८७, रत्नागिरी ६, डहाणू ६४, वर्धा ५.
जुलैत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस अर्थात ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार उत्तर भारताचा काही भाग, मध्य भारत व दक्षिण भारताच्या बहुतांश भागात पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर पूर्व भारत तसेच ईशान्येकडील राज्ये व पूर्व मध्य भारताच्या काही भागात पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्याची पावसाची सरासरी २८०.४ मिमी इतकी आहे.