पुणे : संपूर्ण हंगामात आतुरतेने वाट पाहण्यास लावणारा पाऊस रविवारी रात्री पुणे शहर व जिल्ह्यात बरसला़ सायंकाळनंतर सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण हंगामात पडला नाही इतका ९५ मिलिमीटर पाऊस एका रात्रीत पडल्याची नोंद पुणे वेधशाळेत झाली़ या पावसाने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते़ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून, त्याचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे़ त्या वेळी शेतात उभ्या असलेल्या भातपिकाला मोठा फटका बसला आहे़ आज दिवसभर जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू होता़ खडकवासला धरण साखळीत चोवीस तासांत एकूण ३१३ मिमी पावसाची नोंद झाली़ पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे़ आज सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरण परिसरात १२२ मिलिमीटर पाऊस झाला, तर खडकवासला ९५ मिमी, वरसगाव ५० मिमी, पानशेत धरण परिसरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी सुरूच होत्या.रविवारी रात्री झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका विश्रांतवाडी, धानोरी, सिंहगड रोड परिसराला बसला़ एअरपोर्ट रोडवरील घरात पाणी शिरल्याने अडकलेल्या ४ जणांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली़ मांजरीकडून हडपसरकडे जाणाऱ्या रेल्वेगेट येथील मुख्य रस्त्यावर जुने चिंचेचे झाड सकाळी कोसळल्याने ८ तास वाहतूक ठप्प झाली होती़ लोहगाव, धानोरी परिसरात ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने कडेला लावलेली वाहने नाल्याच्या प्रवाहात काही अंतरावर वाहून गेली़ त्यात अनेक मोटारी, दुचाकींचे नुकसान झाले़ सहकारनगर परिसरातील गगनविहार सोसायटीत भिंत पडून गाड्यांचे नुकसान झाले़ ड्रेनेजचे पाणी परिसरात शिरल्याने दुर्गंधी सुटली होती़ घरात पाणी शिरल्याने पुणेकरांना रात्र जागून काढण्याची वेळ आली़ मुळशी, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर, वेल्हा तालुक्यात जोरदार पाऊस झाला़ खडकवासला, कुडजे, सांगरुन, खानापूर, डोणजे, कल्याण, कोंढणपूर व घेरा सिंहगडसह परिसरात पावसाचे लक्षण दिसू लागताच काढलेले भात पिक जमेल तसे गोळा करण्यासाठी जो तो प्रयत्न करत होता. काही ठिकाणी मळणी सुरू असल्याने भातपिकाचा पेंढा जुळणे, झाकून ठेवण्यासाठी शेतकरीराजाची तळमळ सुरू होती. भात खाचरांत पाणी तुंबून राहिले होते, तर काही खाचरांमधील भाताचे उभे पीक भुईसपाट झाले होते. ग्रामीण भागात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाचा भातपिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका विश्रांतवाडीलापुणे : रविवारी रात्री अचानक कोसळलेल्या धुवाधार पावसाने शहराच्या सर्वच भागांमध्ये कहर केला. सर्वत्र पावसाचे पाणी साचून मोठी तळीच तयार झाली होती. गेल्या काही वर्षांत होत असणारे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, नाल्यांवरची बांधकामे, नियमितपणे स्वच्छ न होणारी गटारे, बुजून गेलेल्या रस्त्याकडेच्या पन्हाळ्या यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्थाच मोडीत निघाल्याचे या पावसाने निदर्शनास आणून दिले. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या दुर्दशेची कडक दखल घेत अग्निशमन दल तसेच बांधकाम विभागाकडे पावसाचे पाणी असे ठिकठिकाणी का साचून राहिले, याचा अहवाल तयार करण्याचा आदेश दिला. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विश्रांतवाडी, टिंंगरेनगर, एकतानगर या परिसरातील नागरिकांना पावसाचा सर्वाधिक मोठा फटका बसला. झोपडपट्टीमधील नागरिकांच्या हलाला तर पारावरच उरला नाही. बहुतेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. नाल्यांवर झालेल्या बांधकामांमुळे रस्त्यावरच्या पाण्याचा फुगवटा वाढला, तर सोसायट्यांच्या संरक्षक भिंतीमुळे तुंबून राहिलेल्या पाण्याने वाहनांचे नुकसान केले. रात्रीपासूनच अग्निशमन दलाकडे तक्रारी येऊ लागल्याने या परिसरात त्यांचे ५० जवान, तसेच ६ वाहने कार्यरत झाली. आज पहाटेपर्यंत त्यांचे काम सुरू होते. येरवडा, धानोरी व लोहगावमध्ये पावसाचा हाहाकार येरवडा : येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, टिंंगरेनगर, कळस, लोहगाव, कलवड, श्रमीकनगर आदी परिसरात रविवारी (दि.२२) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. ढगफुटी झाल्याप्रमाणे कोसळलेल्या या पावसात अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले होते, तर सोमवारी (दि. २३) सकाळी रस्त्यांवरून कंबरेइतक्या वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला. या परिस्थितीमुळे अनेक शाळांना सोमवारी अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंंग बोर्डातील (म्हाडा) इमारती, धानोरीतील गावठाण परिसर, श्रमिकनगर, टिंंगरेनगर, कळस, लोहगाव आदी परिसरात बैठी घरे व इमारतींच्या पार्किंगमध्ये, तसेच दुकानांमध्येही पाणी शिरल्याने नागरिक व व्यावसायिकांची तारांबळ झाली. धानोरीच्या मुख्य रस्त्यावर साईधाम, लक्ष्मीनगर, विठ्ठलमंदिराजवळ तसेच पोरवाल रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेनऊपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूककोंडी झाली होती.
बरसला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस
By admin | Published: November 24, 2015 1:28 AM