लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावरील चक्रीय चक्रवात आता विदर्भ व लगतच्या भागावर आहे. कर्नाटक किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला चक्रीय चक्रवातापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण कोकण व विदर्भ व लगतच्या भागावर आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भावर गारपिटीसह पावसाचे सावट आले आहे. कोकणातही पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रावर कमी दाबाच्या पट्ट्याचे सावट असल्याने राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागांत, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत तर कोकण गोव्याच्या तुरळक भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत मध्य प्रदेशाच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १४.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
गारपिटीचा इशारा
१७ व १८ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १९ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.