लोकमत न्यूज नेटवर्कभोर : आंबवडे खोऱ्यातील चिखलावडे बुदुक गावातील वरचीवाडी व रामवाडीतील ८० ग्रामस्थांना आठ दिवसांपासून विषाणुजन्य तापाची लागण झाली आहे. भोर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे पथक गावात ९ जणांवर उपचार करीत असून, १८ जणांवर भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी शुद्धीकरण करून कोरडा दिवस पाळून संपूर्ण गावात धूर फवारणी केली आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत साथ आटोक्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, गावात भीतीचे वातवरण तयार झाले आहे.भोरपासून १० किलोमीटर अंतरावर रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याला ५०३ लोकसंख्येचे चिखलावडे बुदुक गाव आहे. गावातील वरचीवाडीत ७५, तर रामवाडीत ५० घरे आहेत. गावात १० जूनला लोकांना थंडी, ताप, खोकला खांदेदुखीचा विषाणुजन्य तापाच्या आजाराचा त्रास सुरू झाला. त्यानंतर भोर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुदर्शन मलाजुरे यांनी पथकासह गावात जाऊन १२ जुनला २६ जणांवर, तर १५ जूनला ५१ जणांवर तातपुरते उपचार करुन गावात कोरडा दिवस पाळून धूरफवारणी केली होती. मात्र, त्यानंतरही साथ आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदरची साथ वाढतच गेल्यामुळे गावातील सुमारे १८ लोकांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर काहीनी खासगी दवाखान्यात उपचार घेतल्याचे ज्ञानोबा गेनबा कोंढाळकर व राजेंद्र हरिभाऊ कोंढाळकर यांनी सांगितले.दरम्यान, आज पुन्हा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुदर्शन मलाजुरे यांच्यासह २ परिचारिका, ३ आरोग्य सेवक, २ साहाय्य आरोग्य सेवक, एक फार्मासिस्ट, एक शिपाई, एक चालक यांच्या पथकाने गावातील अंगणवाडीत ७० जणांची तपासणी करून ९ जणांना सलाईन लावून गावातच उपचार सुरू आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करून संपूर्ण गावात कोरडा दिवस पाळून पाणी शुद्धीकरण करून धूरफवारणी करून साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोंढाळकर यांनी सांगितले.
आला पावसाळा; आरोग्य सांभाळा!
By admin | Published: June 19, 2017 5:27 AM