पुणे : शहरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने आज देखील जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले असून, आकाश काळ्या ढगांनी भरून गेले आहे. त्यामुळे शहरभर पावसाच्या सरी कोसळत आहेत.
गणेश चतुर्थीपर्यंत पावसाचा लपंडाव सुरू होता. सकाळपासून दुपारपर्यंत उन्ह असायचे आणि नंतर कुठे तरी हलक्या सरी काही मिनिटांसाठी यायच्या. पण गणपती बाप्पा आले आणि त्यानंतर पावसाने चांगलाच जोर पकडला. गौरी आल्यानंतर तर संततधार सुरूच आहे. शुक्रवारी शहरात दुपारनंतर रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. त्यामुळे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांचे हाल झाले. पावसामुळे अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. त्यानंतर आज देखील दुपारनंतर रिमझिम बरसात होत आहे. त्यामुळे पुणेकर सुखावत आहेत. कारण जूनपासून असा पाऊस पडलेला नव्हता. या दोन दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने पावसाने आपली हजेरी लावल्या दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागारात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा पाऊस दिलासा देणारा आहे. कारण आतापर्यंत असा दोन तीन दिवस पुणे शहरात पाऊस पडला नाही. पहिल्यांदाच या हंगामात सलग तीन दिवस सरी कोसळत आहेत. पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात अधिक पाऊस होत असून, पूर्वेकडील भाग मात्र अद्याप कोरडाच आहे. ‘आयएमडी’च्या नोंदीनूसार शिक्रापूर, यवत, जेजूरी, मोरगाव, कुरकुंभ, बारामती, मंचर परिसरात पावसाची नोंद झालेली नाही.
सध्या मध्य महाराष्ट्रात आकाशात मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी झालेली आहे. परंतु, पुणे परिसरात कमी ढग दिसत असल्याने पावसाचे प्रमाण आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे