मागील दहा वर्षांत येरे येरे पावसा.. म्हटले तरी न येणारा पाऊस मागील वर्षी (सन २०२०) पासून सलग यावर्षी दुसऱ्यांदा जोरदार एंट्री करत आहे. मागील रविवारी गुळुंचेनजीकच्या रायबाचामळा येथे वीज पडल्यानंतर सोमवार ही थोड्याफार सरी आल्या. मंगळवार व आज बुधवारी मात्र दुपारी चारलाच ढगांच्या गडगडट व विजांच्या कडकडाटात दमदार पाऊस सलग दीड ते दोन तास बरसला. या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे कर्नलवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेले बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेजारील विहिरींच्या पणीपातळीत वाढ होणार असल्याचे सरपंच सुधीर निगडे यांनी सांगितले.
पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यातील नीरा, वाल्हे, गुळुंचे, कर्नलवाडी, राख, नावळीसह पुरंदरमधील काही भागात आज माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने या भागातील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केली. मात्र, त्याचबरोबर संततधार पाऊस पडल्याने लोकांनी समाधान व्यक्त केलं. सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात या दोन दिवसांत एक ते दीड तासाच्यापेक्षा जास्त वेळ पाऊस पडला.
मागील वर्षी मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने, यावर्षी मे महिन्यापर्यंत विहिरींची पाणीपातळी टिकून राहिली. त्यामुळे उन्हाळी पिके जोमात आली. कोथिंबीर, मेथी आदी पालेभाज्या बहुतेक शेतकऱ्यांच्या विकल्या गेल्या. मात्र काही मोजक्या शेतकऱ्यांच्या पालेभाज्या या दोन दिवसांच्या पावसाने मातीमोल झाल्या आहेत. डाळिंबाच्या बागांचे नव्या बहराचे कटिंग झाले आहे अशा नव्या सेटिंगला हा पाऊस बाधक ठरणार आहे.
गुळुंचे कर्नलवाडीच्या पश्चिमेला असलेल्या बोलाईमाता डोंगर रांगात काल मंगळवारी ढगफुटी सदृश परिस्थितीत झाली होती. हा परिसर पूर्वी भकास माळराण होते. शहरातील लोकांनी या भागात येऊन मोठ्याप्रमाणावर माळरान खरेदी करून आता काळीमाती भरून शेत तयार केले. हे करताना डोंगरावरुन येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा विचार केला गेला नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याने मिळेल त्या दिशेने वाट काढत. या नव्या शेतांचे मोठे नुकसान केले.
कर्नलवाडी येथे ओढ्यावर नव्याने बांधनण्यात आलेले बंधारे दोनच दिवसांत तुडुंब भरले आहेत.