भोर : तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणे भरण्याची गतीही कमी झाली आहे. भाटघर धरण ३९ टक्के भरले असून, नीरा देवघर ४७ टक्के भरले आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे ९१ टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी दोन्ही धरणे निम्मीच भरली आहेत.तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर धरण भागात आज १३ मिमी पाऊस झाला, तर एकूण १०१८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण ४७ टक्केच भरले तर गतवर्षी १४८८ मिमी पाऊस होऊन धरण ९१ टक्के भरले होते.भाटघर धरण भागात आज २ मिमी पाऊस झाला, तर एकूण ३२० मिमी पाऊस होऊन धरणे ३९ टक्के भरले आहे. मागील वर्षी ९३७ मिमी पाऊस होऊन धरणे ९१ टक्के भरले होते. मागच्या तुलनेत या वेळी पाऊसही निम्माच असून, धरणे ही अर्धीच भरली आहेत. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास धरणे भरायला उशीर होणार आहे. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यावर पश्चिम भागातील शेतकरी भात व नाचणीच्या लावणीत मग्न आहेत. हिर्डोशी खोऱ्यात ५० टक्के लागवडी पूर्ण झाल्या आहेत, तर वीसगाव खोऱ्यात भाताची व कडधान्याची दुबार पेरणीमुळे उशिरा उगवण झाल्याने आता भातलागवडी सुरू झाल्या आहेत. यापुढे पाऊस कमी झाला तर लागवडी पूर्ण होऊ शकत नाहीत. पाणी कमी होत चालले आहे, असे माऊली शिंदे व हनुमंत म्हस्के या शेतकऱ्यांनी सांगितले. तर पूर्व भागात पावसाअभावी भातासह कडधान्याच्या पेरण्याच झाल्या नव्हत्या. सध्या कडधान्याची पेरणी सुरू आहे. भाताच्या तरव्यांची चांगली उगवण झाली नाही त्यामुळे व लागवडीला पाणी कमी आहे. यामुळे व भाताच्या लावण्या सुरू नाहीत. हा बागायती पट्टा असल्याने भातापेक्षा इतर पिकांना शेतकरी अधिक पसंती देतात. आंबवडे खोऱ्यातही भाताच्या उगवण उशिरा झाल्याने सध्या लागवडी सुरू आहेत. तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून, पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास डोंगरदऱ्यातील झरे आटतील व भातासह इतर पिके पाण्याआाावी खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यात दीड महिना खरिपाची उशिरा पेरणी व लागवडी सुरू आहेत. त्यातील ५० टक्के खराब झाले असून, पावसाअभावी पुढील पिकांचे काय होईल, याचा भरोसा देता येत नाही. यामुळे शेतकरी चिंता करीत आहेत. त्यामुळे अजून पावसाची गरज आहे, असे शेतकरी कुडपणे यांनी संगितले. (वार्ताहर)
पावसाचा जोर ओसरला
By admin | Published: July 28, 2014 5:37 AM