पुणे : विदर्भ ते उत्तर तामिळनाडू किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर पूर्व राजस्थान ते तामिळनाडू व लगतच्या श्रीलंका किनारपट्टीपर्यंत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला असून रविवारनंतर राज्यातील पाऊसमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासांत कोकणातील उल्हासनगर ११०, मंडणगड ८०, अंबरनाथ, बेलापूर, डहाणू ७० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच अनेक भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, देवळा, गगनबावडा, गिरणा धरण, लोणावळा तसेच अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मराठवाड्यातील जालना, भोकरदन, जाफराबादसह अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातील अकोट, मलकापूर, नांदुरा, तेल्हारा, धारणी, अकोला, जळगाव जामोद परिसरात पावसाची नोंद झाली होती.
राज्यातील पाऊसमान कमी झाले असून कोणत्याही जिल्ह्यात सध्या अलर्ट नाही. रविवारी कोकण, गोव्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.