लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, १५ जनावरे दगावली; तर, मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात तसेच लवासा येथे दरड कोसळली. बचावकार्यासाठी लष्कर तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. खडकवासलामधून होणारा विसर्ग नियंत्रित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चौघे जण दगावले
डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे पहाटे नदीपात्रातील स्टॉल काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ताम्हिणी घाटातील आदरवाडीत दरड कोसळून शिवाजी बहिरट (रा. मुळशी) यांचा मृत्यू झाला असून, जितेंद्र जांभुरपाने (रा. गोंदिया) जखमी झाले आहेत. लवासा सिटी येथे दरड कोसळली असून, त्यात तिघे अडकले. वारजे १५ म्हशी पाण्यात बुडाल्याने मृत्युमुखी पडल्या. मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. सर्वाधिक ५५६ मिमी ताम्हिणी घाटात नोंदला आहे.
पर्यटनस्थळे बंद
पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे पुढील दोन दिवसांसाठी तातडीने बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ प्रमुख राज्यमार्ग व ५ प्रमुख जिल्हामार्ग असे सात मार्ग बंद करण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली.
पुणे भरले कारण... खडकवासला धरण
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे एका दिवसात तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे, तर खडकवासला धरण काठोकाठ भरल्याने गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल एक टीएमसी पाणी सांडव्यातून सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे चार हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.
खडकवासला धरणावरील तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने खडकवासला धरण ५० टक्क्यांपर्यंत रिते करण्याचे आदेश पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत, तर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला प्रकल्पात ७५ टक्के अर्थात २२.०३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. खडकवासलाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरण बुधवारी पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला.