पिंपरी : दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्यानंतर सायंकाळी पिंपरी - चिंचवड आणि मावळ परिसराला बुधवारी वादळी पावसाने पाऊन तासभर अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची कधी नव्हे इतकी क्षणातच तारांबळ उडाली. नेमकी कामावरून घरी जाण्याची वेळ असल्याने कित्येक जणांना अडकून पडण्याची वेळ आली. लग्नसमारंभांची पुरती वाताहत झाली. तर लगतच्या ग्रामीण भागातही झालेल्या जोरदार पावसाने शेतीचे व वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ५ दिवसांपासून पुणे, पिंपरी - चिंचवड, मावळ, मुळशी परिसरात खंडित स्वरूपाचा पाऊस पडत आहे. एखाद्या भागात जोरदार पाऊस तर दुसऱ्या भागात नाही, अशी परिस्थिती होती. मात्र बुधवारी परिस्थिती वेगळी राहिली. सकाळपासून वातावरणातील उकाडा वेगळाच असल्याचा प्रत्यय येत होता. दुपारी २ च्या सुमारास ढग दाटून आले. अडीचच्या सुमारास पिंपरी, चिंचवड, पिंपळे निलख परिसरात तुरळक पाऊस सुरू झाला. मात्र काही क्षणांतच तो थांबला. मात्र सायंकाळी ६.१५ ला चक्राकार वारे वाहू लागले. क्षणात वादळी वारे आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. पाऊस सुरू होताच लगेचच परिसरातील वीजपुरवठा बंद झाला. पाऊस उशिराने येईल अशा अपेक्षेने दुचाकीवरून , पायी, निघालेल्या शहरवासीयांना या पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे दुचाकी चालविणेही कठीण झाले होते.नेहरूनगर, संत तुकारामनगर, मासुळकर कॉलनीत बुधवारी सांयकाळी ६ च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. रोहित्राचा स्फोट झाल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. (प्रतिनिधी)
पावसाने त्रेधा
By admin | Published: May 14, 2015 4:26 AM