पुणे : शहरातील सर्व नाले, ड्रेनेजसफाई करण्याची ३१ मेची डेडलाइन संपून गेली तरी अद्याप सरासरी ५० टक्के कामे अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे वस्त्या, झोपडपट्ट्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये ३१ मेपर्यंत प्रशासनाने पार पाडलेल्या पावसाळी कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील ४ झोनची माहिती प्रशासनाकडून या वेळी सादर करण्यात आली. त्यामध्ये अजून खूप कामे बाकी असल्याचे आढळून आले. स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके व इतर सदस्यांनी या प्रकाराचा जाब प्रशासनाला विचारला. येत्या आठवडाभरात ही कामे पूर्ण झाली नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी या वेळी स्पष्ट केले.झोन १ अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांनी ८४ हजार ९६५ मीटर पावसाळी लाइनपैकी ४० हजार ३८३ मीटरची स्वच्छता केली आहे. झोन क्रमांक २ मध्ये ९८ हजार २४६ पैकी केवळ १५ हजार १४५ मीटर लाइनची स्वच्छता केली. झोन ३ मधील ७२ हजार मीटर लाइनपैकी १४ हजार ६७५ लाइनची स्वच्छता करण्यात आली आहे. झोन ४ मधील कामांची स्थिती खूपच वाईट आहे. दरवर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातात. मात्र, ३१ मेची डेडलाइन संपली तरी अद्याप मोठ्या प्रमाणात कामे शिल्लक राहिली आहे. यंदा अनेक क्षेत्रीय कार्यालयांनी नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडरच काढण्यास खूप उशीर लावला.नाल्यांची परिस्थिती खूपच वाईट ४शहरामध्ये वारजे, शिवाजीनगर, प्रभात रोड, औंध, बावधन, कोथरूड, पाषाण, बाणेर, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी, हडपसर, कोंढवा, कोरेगाव पार्क, कॅम्प, मार्केट यार्ड, नवी पेठ, अलका चौक, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, धायरी या परिसरातून प्रमुख २७ नाले वाहतात. ४वर्षभर या नाल्यांमध्ये प्लास्टिक, राडारोडा व इतर विविध प्रकारचा कचरा अडकून पडलेला आहे. या नाल्यांची सफाई न झाल्यास पावसाळ्यामध्ये पाण्याचा मोठा प्रवाह नाल्यातून वाहू लागल्यानंतर पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाल्याच्या परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळी स्वच्छता निम्मीच!
By admin | Published: June 01, 2016 2:14 AM