भोर: छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील शिवालयात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या आणि पावन भूमी असलेला ऐतिहासिक वारसा लाभलेला स्वराज्याची साक्ष देणारा रायरेश्वर किल्ला.
रायरेश्वर किल्ला पुणे भोर ५० किलोमीटर आणि भोरवरून कोर्ले मार्गे २७ किलोमीटर अंतरावर आहे. असा एकूण ७७ किलोमीटर अंतरावर असणारा रायरेश्वर किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. सुमारे १५०० मीटर उंचीच्या एका विस्तृत पठारावर प्राचीन शिवस्थान आहे. येथे सह्याद्री डोंगर रांगेतील असलेल्या या पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची ४५८९ फूट आहे. महाराष्ट्रात एवढ्या उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. पूर्व-पश्चिम १६ किलोमीटर लांब व दक्षिण उत्तर २ ते ३ किलोमीटर रुंद असे रायरेेेेश्वरचे पठार हे रायरीचे पठार म्हणून ओळखतात.
रायरेश्वरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ शिवमंदिरात घेतली. सात रंगाची माती, पांडवकालीन लेणी,पाण्याचे गोमुखकूंड, विलोभनीय असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड (नाकिंदा),भुयारी मार्ग अशी सुप्रसिध्द ठिकाणांना शिवप्रेमी, पर्यटक भेटी देतात. दाटझाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. सदर पठार वर्षाऋतूत पाहण्यासारखे असते. पावसाळा सुरू झाला की रायरेश्वर पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातींच्या, रंगांच्या, आकारांच्या या फुलांची जणू काही एक बहारदार चादरच सह्याद्रीच्या कडेपठारांनी ओढलेली असते. काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतचे आयुष्य असणाऱ्या या फुलांचे एक समृद्ध भांडारच ऑक्टोबर अखेरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात एकदाच फुलते, कवळा,रानहळद,गोकर्ण,काटेसावर, पिवळा धोत्रा,तेरडा,जांभळी मंजिरी, सोनतारा, घाणेरी, ऑर्किड, दाहण ही रानफुले मन मोहून घेतात. अशा या रायरेश्वर किल्ल्यावरून दिसणारे मनमोहक दृष्य असते.
किल्ल्यावरून एकाच नजरेत दिसणारे किल्ले तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, रोहिडा, कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, लिंगाणा, रुद्रमाळ, चंद्रगड तसेच देवघर धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच येत असतात. पावसाळ्यात उंच डोंगरावरून पडणारे धबधबे पडतात एका ठिकाणी तर वाऱ्याच्या प्रेशरने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह उलट्या दिशेने खालून वरती जातो हे पाहण्यासाठी आणि फुलांचा बहर आला की मोठ्या प्रमाणात पर्यटक अधिकच गर्दी करीत असतात.