लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : येथील माऊलींच्या पालखीचा जुना मुक्कामतळ लहान असल्याने सोहळ्याच्या मुक्कामासाठी जेजुरी शहराच्या पूर्वेला औद्योगिक वसाहतीला लागूनच नव्याने पालखीतळ विकसित करण्यात येणार आहे. तो तळ सासवड येथील पालखीतळाप्रमाणेच विकसित केला जावा, अशी मागणी आळंदी देव संस्थानचे विश्वस्त, माऊलीच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख अभय टिळक आणि जेजुरीकर नागरिकांची आहे.जेजुरी येथील सध्या अस्तित्वात असणारा पालखीतळ खूपच लहान असल्याने पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी नव्याने जागा शोधण्यात आली आहे. २० वर्षांपूर्वी जेजुरी येथे शासनाने कोथळे रोडलगत माऊलींच्या सोहळ्याच्या मुक्कामासाठी पालखीतळ विकसित केला होता. त्या वेळी पालखीतळाभोवताली खासगी मोकळी जागा उपलब्ध असल्याने सोहळ्याच्या मुक्कामाला अडचणी येत नव्हत्या. मात्र आता तळाभोवतालच्या खासगी जागांवर घरे उभी राहिल्याने सोहळ्याला ती जागा खूपच कमी पडू लागली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी माऊलींचा सोहळा मुक्कामी थांबत नाही. सोहळ्याच्या मुक्काम तळासाठी जेजुरीच्या पूर्वेला लोणारी समाज ट्रस्टची साधारणपणे २५ एकर जागा आहे. ती जागा योग्य असल्याने तेथेच सोहळ्याचा मुक्काम होऊ लागला आहे. मात्र ही जागा खासगी असल्याने तिचे भूसंपादन होणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच तिचे भूसंपादन होणार असून साधारणपणेदोन कोटी रुपये खर्चून या नियोजित पालखीतळाचा विकास केला जाणार आहे. तळाचा विकास करताना सुशोभीकरणाबरोबरच बहुउद्देशीय असावा. यामुळे तळाची देखभाल ही व्यवस्थित राहील.
सासवडच्या धर्तीवर जेजुरीचा पालखीतळ उभारावा
By admin | Published: June 10, 2017 1:50 AM