बारामती : बारामतीकरांचे आकर्षण ठरलेल्या शेतकरी पुतळाचा परिसर बळकावण्यासाठी रातोरात उद्ध्वस्त करण्यात आला. ‘लोकमत’ने याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज त्याचे पडसाद उमटले. ज्यांनी पुतळा उद्ध्वस्त केला, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर त्याच जागेवर शेतकरी पुतळा तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. नगरपालिकेच्या जागेवर १९७१ साली लायन्स क्लबने शेतकरी उद्यान उभारले होते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून उसाची मोळी घेऊन चाललेला पुतळा उभारण्यात आला होता.या संदर्भात आज शेतकरी कृती समितीचे नेते रंजनकाका तावरे, विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, शिवसंग्रामचे महेंद्र तावरे, भाजपाचे कुलभूषण कोकरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, सामाजिक कार्यकर्ते शाकीर बागवान, भाजप अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष आसिफ खान, शिवसेनेचे उपप्रमुख अॅड. राजेंद्र काळे आदींनी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना पुतळा तोडल्या प्रकरणी जाब विचारला. या प्रकरणी रितसर संबंधित समाजकंटकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच, त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारावा, नगरपालिकेने पुतळा न उभारल्यास सर्व पक्षांच्या वतीने नगरपालिकेस शेतकरी पुतळा भेट देण्यात येणार आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना रंजन तावरे म्हणाले, शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बारामतीतच शेतकरी पुतळा तोडला जात आहे. ही बाब निषेधार्ह आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे. विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी सांगितले की, पुतळ्याची पुर्नस्थापना नगरपालिकेने न केल्यास लोकवर्गणीतून त्याच ठिकाणी पुतळा बसविण्यात येईल. भाजपचे असिफ खान यांनी त्या परिसरात असलेल्या संस्थेला पुतळ्याची जागा बळकविण्यासाठी पुतळा पाडला आहे का, असा जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारला. भाजपचे शहराध्यक्ष नितिन भामे यांनी यापूर्वी पाण्याची टाकी पाडून जागा बळकावली आहे. नगरपालिकेने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तर रासपचे किशोर मासाळ यांनी पुतळ्याच्या बाबत तातडीने पुन्हा निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्यांना नगरपालिकेत काम करण्यापासून रोखले जाईल. तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.पुतळा पाडणे आणि उभारणे हे नगरसेवकांना विचारात न घेता कसे घडले, याचा जाब विचारण्यात आला. त्यासाठी पालिकेत ठराव केला आहे का, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
त्याच जागी पुतळा उभारा
By admin | Published: February 12, 2015 2:26 AM