लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “तुम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र आता विद्यमान सरकारकडून त्याबाबत हेळसांड होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही त्याविरोधात आवाज उठवावा,” अशी मागणी करणारे निवेदन शिवसंग्राम संघटनेने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले.
महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांची बैठक घेण्यासाठी फडणवीस गुरूवारी (दि. ११) महापालिकेत आले होते. त्यावेळी ‘शिवसंग्राम’चे प्रवक्ते तुषार काकडे, सचिन दरेकर, अभिजित म्हसवडे, शिवशंभू फाउंडेशनचे रोहन पायगुडे, शिवाजी हुलावळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
काकडे यांनी मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती देत सरकार यात लक्ष घालत नसल्याची तक्रार केली. अशा वेळी तुम्ही तटस्थ भूमिका न घेता सरकारला न्याय भूमिका घेण्यास भाग पाडावे अशी मागणी केली. फडणवीस त्यांना म्हणाले की, सरकारी कामकाजाची मी माहिती घेत आहे. सरकारने काय करायला हवे तेही सांगत आहे. सरकार काही करत नसेल तर त्यांना नक्कीच धारेवर धरेन.